_सध्या गूळनिर्मितीसाठी उसाची को ९२००५ ही जात प्रामुख्याने वापरली जाते. मात्र राज्याच्या बहुतांश भागात तिचे उत्पादन कमी मिळते. तसेच रोगांचा प्रादुर्भावही भरपूर प्रमाणात होतो. मात्र यंदा गुळउत्पादनासाठी पुर्वप्रसारित करण्यात आलेली ऊस जात कोएम ०९०५७ ही राज्यातील सर्वच भागात लागवडीस उत्तम असून उताराही चांगला आहे.
_भारतात ऊस उत्पादनापैकी जवळपास १६ टक्के ऊस गूळ उत्पादनासाठी वापरला जातो. सद्यस्थितीत को ९२००५ या जातीच्या उसाचा गूळनिर्मितीसाठी वापर केला जातो. मात्र या जातीत काही त्रुटी असल्यामुळे तिला कोएम ०९०५७ ही जात पर्याय आहे.
को ९२००५ जातीतील त्रुटी
_ही जात कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात, जास्त पावसाच्या, हलक्या, निचऱ्याच्या तांबड्या जमिनीत चांगली वाढते. मात्र मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील खोल काळ्या जमिनीत चांगल्याप्रकारे वाढत नाही.जास्त पावसाच्या भागातही अलीकडे या जातीवर तांबेरा, तपकिरी ठिपके या रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येतो.
_कोएम ०९०५७ जातीबाबत
ही यावर्षी पूर्वप्रसारीत केलेली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जास्त पावसाच्या प्रदेशात तसेच मध्य महाराष्ट्रातील खोल काळ्या जमिनीतही ही जात उत्तम प्रकारे वाढते.या जातीपासून उत्तम प्रतीचा गूळ तयार होतो.कोएम ०९०५७ या जातीची पैदास को ९४०१२ या जातीवर को ७७५, को ९४००८, को ८६०११, आय.एस.एच. ६९, कोटी ८२०१, कोव्ही ९२१०२, को ८६२४९ आणि को ६२१९८ या नर जातींचा संकर करून केलेली आहे.
_
कोएम ०९०५७ जातीची वैशिष्ट्ये
मध्यम ते भारी जमीन, काही प्रमाणात चोपण जमिनीतही चांगली येते.१२ ते १४ महिन्यांत पक्व होते.कोणत्याही रसायनाशिवाय फक्त भेंडीचा वापर करून या जातीपासून “अ” ग्रेडचा गूळ तयार होतो.सरळ वाढते, खोल व काळ्या जमिनीत लोळत नाही.पाण्याचा ताण सहन करते.वाढ्यावर अजिबात कूस नाही.उसाची जाडी (३.१७ सें.मी.) असून सरासरी वजनही (१.६४ किलो) इतर जातींपेक्षा अधिक आहे.कांडी किडीस कमी प्रमाणात बळी पडते.काणी रोगास प्रतिकारक्षम असून पानावरील तपकिरी ठिपके, तांबेरा या रोगांना कमी प्रमाणात बळी पडते.तुरा उशिरा व कमी प्रमाणात येतो.पाचट सहज निघते, त्यामुळे ऊस तोडणी सुलभ होते.खोडवा मध्यम प्रतीचा आहे.
(_डॉ. रामदास गारकर )