गुरुवार, ७ डिसेंबर, २०१७

स्पर्धा परीक्षा : वेळेचे व्यवस्थापन

कोणीही आजचा वेळ उद्यासाठी वाचवून ठेवू शकत नाही. आजचा वेळ आजच उपयोगात आणता येऊ शकतो. उद्याचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी (लक्षात घ्या, आपल्या वेळेचा आपल्यापेक्षा कोणीही योग्यप्रकारे उपयोग करू शकत नाही.) काहीजण वेळेचे बंधन पाळून आपले जीवनमान उंचावतात तर काहीजण वेळेचे गुलाम होऊन बसतात. (गुलाम म्हणजे असे म्हणणारे की आज माझी वेळ खराब आहे, नंतर बघेन.)

वेळ ही फार महत्त्वाची बाब आहे. काही वेळा तर ‘वेळ’ हीच सर्वस्व बनून बसलेली असते. वेळ फक्त त्यांचाच मान राखते, जे वेळेचा मान राखतात. वेळ ही प्रत्येकासाठी महत्त्वाची बाब असून आपल्या प्रगतीत ती फार महत्त्वाची भूमिका बजावते. फक्त तिचा वापर कसा करावा याचे ज्ञान व्हायला हवे, तरच आपण आपले ध्येय/उद्दिष्ट जलद गाठू शकतो. वेळेचा योग्य वापर ही बाब बऱ्याचजणांसाठी एक समस्या बनलेली असते. यासाठी वेळेचे व्यवस्थापन हाच एक योग्य उपाय आहे. वेळेचे व्यवस्थापन ही एक साधी गोष्ट असून त्यासाठी वेगळे प्रयत्न कशाला करायला हवेत. दबावाखाली असलो की मी व्यवस्थित काम करतो तर मग मी वेळेचे व्यवस्थापन कशाला करू असे बरेच प्रश्न काहीजणांच्या मनात उद्भवतात. परंतु सत्य हे आहे की, वेळेचे व्यवस्थापन ही करीयरसाठी एक गुरुकिल्ली आहे. वेळेच्या व्यवस्थापनामुळे आपल्या कार्यक्षेत्रात व जीवनात बऱयाच गोष्टींचा वापर करण्याचे ज्ञान प्राप्त होते.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी अभ्यासाचे नियोजन हे पूर्णपणे वेळेच्या व्यवस्थापनावर अवलंबून आहे. परीक्षेचे दोन तास हे पूर्णपणे चांगले जाण्यासाठी परीक्षेपूर्वी घालविलेला वेळ (वर्षभर – सहा महिने – दोन अथवा तीन महिने किती अभ्यास केला?) फार महत्त्वाचा आहे. (एखादा क्रिकेटर सचिन, द्रविड, विराट प्रत्यक्ष मॅचच्या वेळी कसा परफॉर्मन्स देईल हे त्याने केलेल्या सरावावर अवलंबून आहे.)

स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी ज्या दिवसापासून ठरविले असेल की आपल्याजवळ अभ्यासासाठी किती वेळ उपलब्ध आहे? ( मग ती परीक्षा यूपीएससी, एमपीएससी, वॉकिंग, अथवा स्टाफ सिलेक्शनची असो) त्यातील वाचनासाठी किती वेळ द्यावा, गणित व बुद्धिमत्ता या विषयांवरची उदाहरणे सोडविण्यासाठी किती वेळ द्यावा, उजळणीसाठी किती वेळ द्यावा, प्रत्येक विषयाला किती वेळ द्यावा तसेच उजळणी केव्हा सुरू करावी या सर्व प्रश्नांच्या उत्तरांत वेळेचे नियोजन हा सामाईक घटक आहेच आणि मग का एकदा या प्रकारचे नियोजन आपण योग्यरीतीने करू शकलो तर प्रत्यक्ष परीक्षेला वेळ कसा योग्य पद्धतीने वापरता येईल या सरावाचीच अंमलबजावणी करायची शिल्लक राहील.

आपला दिनक्रम कसा आहे? (समजा नोकरी करीत असाल अथवा विद्यार्थीदशेत असाल तर किंवा पूर्णपणे स्पर्धापरीक्षांची तयारी करीत असाल तर) वर्तमानपत्र वाचण्यासाठी किती वेळ द्यावा व कोणता वेळ द्यावा हे ठरविता आले पाहिजे आणि ही व्यक्तिपरत्वे बदलणारी मापदंडे आहेत. (चालू घडामोडींच्या अभ्यासासाठी बातम्या पाहणे.)

वेळ कोणासाठी थांबत नाही तसेच गेलेली वेळ परत येत नाही. म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेळेचे योग्य नियोजन केले तर काम भरपूर आहे परंतु वेळ मिळत नाही हे म्हणण्याची वेळ येणार नाही. त्यामुळेच प्रत्येकाने पुढील सूचनांचा उपयोग करून पाहावा.

स्वतःपासून सुरुवात करून विचार करायला हवा की, आपण आपला अमूल्य वेळ कसा वाया घालवतो. तसेच प्रत्येकाने वर्षाचे, महिन्याचे, आठवडय़ाचे तसेच दिवसाचे ध्येय ठरवून त्या ध्येयापर्यंत कसे पोहोचायचे याचे नियोजन करायला हवे.

कामांचा क्रम ठरवा. महत्त्वाच्या कामासाठी वेळ, त्यानंतरची कमी महत्त्वाची असा अग्रक्रम ठरवायला हवा.

अनावश्यक कामांना प्राधान्य न देता महत्त्वाची कामे अगोदर पूर्ण करणे. कामाची विभागणी करून प्रत्येक कामासाठी योग्य वेळ ठरविणे.

रोजच्या कामांसाठी एक छोटी डायरी करून अग्रक्रम ठरवा.

वेळेचा योग्य वापर केला तर वेळ ही सर्वात अमूल्य बाब आहे. हे ज्या लोकांना पटले ते यशस्वी झाले आहेत.

जर तुम्ही यापूर्वी कधीही वेळेचे व्यवस्थापन केले नसेल तर तशी आखणी करण्यास आणखी काही वेळ लागेल; परंतु एकदा तुम्ही हे योग्यप्रकारे करू शकलात तर तुम्ही निश्चितच तुमच्या ध्येयाकडे जलद पोहोचाल व यशस्वितांच्या यादीत तुमचेही नाव जोडाल.

वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे सर्वांनाच माहीत आहे आणि जो वेळेचा पुरेपूर सदुपयोग करतो तो निश्चितच यशस्वी होतो. या जगात सर्वांनाच सारखा वेळ विधात्याने दिलेला आहे. कोणालाही दिवसाचे २५ तास दिलेले नाहीत. असे असूनही काहीजण यशस्वी तर काहीजण अयशस्वी का होतात? तर याचे मूळ कारण वेळेचे व्यवस्थापन या घटकाशी निगडित आहे. त्यामुळे यश आणि अपयश या दोन्ही गोष्टींचा वेळेच्या व्यवस्थापनाशी फार घनिष्ठ संबंध आहे.